किल्ला क्र. १० रायगड ( Raigad ) भाग १

 रायगड  

शिवराज्याभिषेकाचा सोहळा अनुभवणारा एकमेव किल्ला रायगड. 
रायगड.... महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगात असून समुद्रसपाटी पासून सुमार ८२० मी ( २७०० फूट ) उंचीवर आहे. मराठी साम्राज्याच्या इतिहासामध्ये त्याची एक खास ओळख आहे. शिवाजी महाराजांनी रायगडाचे स्थान आणि महत्त्व पाहून याला आपल्या राज्याची राजधानी बनविली. शिवराज्याभिषेक याच गडावर झाला. इंग्रजांनी गाद ताब्यात घेतल्यावर लुटून त्याची नासधूस केली. सादर किल्ला हा महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागाचे संरक्षित स्मारक आहे. 
युरोपचे लोक त्यास ' पूर्वेकडील जिब्राल्टर ' असे म्हणत आहे. जिब्राल्टरचे ठाणे जितके अजिंक्य तितकाच रायगड अजिंक्य व दुर्गम. पाचशे वर्षांपूर्वी त्यास गडाचे स्वरूप नव्हते व तो नुसता एक डोंगर होता. तेव्हा त्यास 'रसिवटा' व ' तनस' अशी दोन नवे होती. त्याचा आकार, उंची व सभोवतालच्या दऱ्या वरून त्यास ' नंदादीप' असेही म्हणतात. निजामशाहीत रायगडाचा उपयोग कैदी ठेवण्यापुरता होई. मोऱ्यांचा प्रमुख यशवंतराव मोरे जावळीहून पळून रायगडावर जाऊन राहिला तर प्रतापराव मोरे विजापुरास पळाला. 
महाराजांनी ६ एप्रिल १६५६ रोजी रायरीस वेढा घातला व मे महिन्यात रायरी महाराजांच्या ताब्यात आली. तेथे असताना कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद खजिना घेऊन विजापूरकडे निघाल्याची बातमी महाराजांना समजली. त्यांनी तो खजिना लुटून रायगडावर आणला व त्या खजिन्याचा उपयोग गडाच्या बांधकामासाठी केला. रायगडाचा माथा राजधानी बनवण्यास सोयीचा व पुरेसा आहे. शत्रूला अवघड वाटणाऱ्या प्रदेशातले ते अधिक अवघड ठिकाण आहे. सागरी दळणवळणासही ते ठिकाण जवळ आहे. म्हणून महाराजांनी राजधानीसाठी या गडाची निवड केली. रायगड किल्ल्याचे पूर्वीचे नाव जम्बुदीप असे होते. 
" राजा खास जाऊन पाहता गाद बहुत चखोटा. चौतर्फा गडाचे कडे तासिल्याप्रमाणे दिड गांव उंच. पर्जन्यकाळी कडियावर गावात उगवत नाही आणि धोंडा तासीव एकच आहे. दौलताबाद पृथ्वीवर चखोट गाद खरा. परंतु तो उंचीने थोडका. दौलताबादचे दशगुणी गाद उंच असे देखोन बहुत संतुष्ट झाले आणि बोलिले, तक्तास जागा हाच गड करावा. "
 या गडाला विविध नावांनी संबोधिले गेले आहे- रायगड, रायरी, इस्लामगड , नंदादीप, जम्बुदीप, तनस, राशीवटा, बदेनूर, रायगिरी, राजगिरी, भिवगड, रेड्डी, शिवलंका, राहीर आणि पूर्वेकडील जिब्राल्टर. 

रायगडाचे स्थान लक्षात घेऊन या किल्ल्यावरच राजधानी बसवण्याचे महाराजांनी निश्चित केलं. रायगडचं जुनं नाव रायरी, गडाचा विस्तार प्रचंड असून समुद्र सपाटीपासून किल्याची उंची २९०० फूट आहे. गडाला सुमारे १४३५ पायऱ्या आहेत. गडाच्या पश्चिमेकडे हिरकणी बुरुज आहे, उत्तरेकडे टकमक टोक, श्री शिरकाई मंदिर आणि मध्यभागी असलेल्या महाराजांचा पुतळा हे मुख्य आकर्षण आहे. 
शिर्के पाचव्या शतकापासून रायगडचे स्वामी होते. याची आठवण देणारी गडस्वामींनी श्री शिरकाई मंदिर गडावर आहे. लोकमान्य टिळकांच्या काळात मावळंकर नावाच्या इंजिनिअरने हे मंदिर बांधले आहे. ते श्री शिरकाईचे मूळ मंदिर नाही. मूर्ती मात्र प्राचीन आहे. मूळ शिरकाई मंदिर राजवाड्यास लागून डावीकडे होळी माळावर होते. तेथे मूळ देवळाचा चबुतरा आहे.
 शिवराज्याभिषेक... रायगडाने अनुभवलेला सर्वश्रेष्ठ प्रसंग. महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे महाराष्ट्राचाच नव्हे तर भारताच्या इतिहासातील एक लक्षणीय घटना आहे. १९ मे १६७४ रोजी राज्याभिषेकाच्या विधी पूर्वी महाराजांनी प्रतापगडाच्या भवानीचे दर्शन घेतले. तीन मन सोन्याचे छत्र देवीला अर्पण केले. गडावरील राजसभेत ६ जून १६७४, ज्येष्ठ शुद्ध १३ शके १५९६, शनिवार या दिवशी विधिपूर्वक राज्याभिषेक साजरा झाला.
रायगडाने अनुभवलेला अत्यंत दुःखद प्रसंग म्हणजे महाराजांचे निधन. शके १६०२ रुद्रनाम संवत्सरे चैत्र पौर्णिमा, हनुमान जयंती दि. ३ एप्रिल १६८० या दिवशी महाराजांचे निधन झाले. सभासद बखर म्हणते, ' ते दिवशी पृथ्वीकंप जाहला. अष्टदिशा दिग्दाह होऊन गेला. श्रीशंभूमहादेवी तळ्याचे उदक रक्ताम्बर जाले. ' पुढे शके १६०२ रौद्र संवत्सर माघ शु. ७. १६ फेब्रुवारी १६८१ या दिवशी रायगडावर संभाजी महाराजांचे विधीपूर्वक राज्यारोहण झाले. इ.स. १६८४ च्या सप्टेंबर मध्ये औरंगजेबाने रायगडाच्या मोहिमेस सुरवात केली. ता. २१ रोजी शहाबुद्दीन खान यास चाळीस हजार सैन्यासह बादशहाने रायगडाच्या पायथ्यशी धाडले. १५ जानेवारी १६८५ च्या सुमारास शहाबुद्दीने गडाच्या पायथ्याशी असलेल्या एक गावाला आग लावली व लुटालूट चालू केली. पण प्रत्यक्ष रायगडावर हल्ला न करता तो १६८५ च्या मार्चमध्ये परतला. औरंगजेबाने आपला वजीर आसदखान याचा मुलगा इतिकादखान उर्फ झुल्फिकारखान यास सैन्य देऊन रायगड घेण्यास पाठवले.

 शके १६१० विभव संवत्सर फाल्गुन शु. ३, १२ फेब्रवारी १६८९ रोजी राजाराम महाराजांची कारकीर्द सुरु झाली आणि २५ मार्च १६८९ रोजी खानाने गडास वेढा घातला. दि. ५ एप्रिल १६८९ रोजी राजाराम महाराज रायगडावरून निसटून प्रतापगडावर गेले. पुढे जवळजवळ आठ महिने वेश चालू होता. पण दि. ३ नोव्हेंबर १६८९ रोजी सूर्याजी पिसाळ या किल्लेदाराच्या फितुरीमुळे किल्ला मोगलांना मिळाला. वाईची देशमुखी देण्याचे अमिश दाखवून खानाने त्यास फितूर केले. झुल्फिकारखान हा बादशहाने इतिकादखानला दिलेला 'किताब आहे. पुढे रायगडचे नामांतर ' इस्लामगड ' असे झाले. ५ जून १७३३ या दिवशी शाहूमहाराजांच्या कारकीर्दीत मराठयांनी पुन्हा रायगड घेतला.
धन्यवाद.... 

Comments